बलात्काराचा आरोप असणाऱ्याला ‘Matoshree’ वर पक्षप्रवेश; Shiv Sena UBT कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप

1080
बलात्काराचा आरोप असणाऱ्याला ‘Matoshree’ वर पक्षप्रवेश; Shiv Sena UBT कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप
  • खास प्रतिनिधी

बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करणाऱ्या शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी याच बदलापूर जवळच्या कल्याणमधील बलात्काराचा आरोप असणाऱ्या साईनाथ तारे याला ‘मातोश्री’वर शिवसेना उबाठा गटात प्रवेश दिला. याबाबत उबाठाच्या ठाणे जिल्हा प्रमुखांनी उद्धव ठाकरे यांना याबाबत कल्पना देऊनही त्याची दखल घेण्यात आली नसल्याने उबाठा (Shiv Sena UBT) कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बदलापूर घटनेनंतर महायुतीविरुद्ध मोहीम

बदलापूर अत्याचार घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारविरुद्ध मोहीम उघडली होती. तसेच बदलापूर रेल्वे स्टेशनवर कार्यकर्ते पाठवून या विषयाचे राजकारण केले. मंगळवार ३ सप्टेंबरला, बलात्काराचा आरोप असणाऱ्या साईनाथ तारे यांना शिवसेना ‘मातोश्री’वर आमंत्रित करून उबाठा गटात प्रवेश देण्यात आला. बलात्काराचा आरोप असणाऱ्या तारे यांना वर्षभर कुठल्याही निवडणुकीत उमेदवारी देऊ नये, अशी विनंती स्थानिक कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्याकडे केली आहे.

(हेही वाचा – ओलीसांना वाचवण्यात अपयशी ठरल्याबद्दल PM Benjamin Netanyahu यांनी मागितली माफी)

ठाकरेंना खरमरीत पत्र

या प्रवेशाच्या कार्यक्रमानंतर तात्काळ उबाठा (Shiv Sena UBT) ठाणे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांनी उद्धव ठाकरे यांना एक खरमरीत पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. या पत्रावर जिल्हा सचिव जयेश वाणी, उपजिल्हाप्रमुख विजय काटकर, शहर संघटिका सुजाता धारगळकर, उपशहर प्रमुख दिनेश शेट्टे, जिल्हा युवती अधिकारी प्राजक्ता काटकर, उपजिल्हा युवा अधिकारी धनंजय कणखरे, प्रभाग क्षेत्र संघटक प्रसन्न कापसे, विभाग संघटक सुरेश तेलवणे, शाखाप्रमुख मनोज कांबळे, उपविभाग प्रमुख प्रतीक धनवे, युवा सेना शहर चिटणीस अक्षय एखंडे, युवा सेना विभाग अधिकारी केतन मुरबाडे यांनीही सह्या केल्या आहेत.

उत्स्फूर्त बैठक

भोईर यांनी ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, “साहेब, खालील स्वाक्षऱ्या करणारे जिल्हा-शहर पदा‌धिकारी आज कल्याण शहर शाखेत स्वयंप्रेरणेने झालेल्या बैठकीला उपस्थित होते व खालील ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले आहेत. तरी साहेब आपणास नम्र विनंती की, खालील ठरावांचा सहानुभुतीपूर्वक विचार व्हावा.

पाच ठराव मंजूर

१) आजच्या होऊ घातलेल्या शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे अडीच वर्षे इमाने इतबारे काम करणाऱ्या संघटनेच्या कामासाठी स्वकष्टाने, घामाने कमावलेल्या पैशाला खार लावणाऱ्या, अंगावर गुन्हे घेणाऱ्या दबाव स्विकारणाऱ्या निष्ठावंताच्या भावना अत्यंत प्रक्षुब्ध आहेत. संघटना अशा प्रवेशाने स्तब्ध झालीय.

२) बलात्काराचे गुन्हे दाखल असणाऱ्या शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख साईनाथ तारे यांना प्रवेश देण्याने संघटनेच्या सामाजिक, निष्ठेच्या चेहऱ्याला धक्का लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

३) आज प्रवेश करत असलेल्या तारे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वायले नगर, खडक‌पाडा या त्यांच्या परिसरात आपल्या शिवसैनिकांना दमदाटी करून त्याना बुथदेखिल लावून दिले नाहीत, ह्या गोष्टीचा संघटनेवर, शिवसैनिकांवर खोलवर परिणाम झाला होता.

४) निष्ठावंतांच्या निष्ठेचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या मनातील निष्ठा कायम राखण्यासाठी यापुढे असे प्रवेश करण्यात येऊ नये.

(हेही वाचा – आता ‘लाडक्या भावांच्या’ खात्यात सप्टेंबरच्या ‘या’ तारखेला पैसे होणार जमा – Minister Mangal Prabhat Lodha)

निवडणुकीत उमेदवारी देऊ नये

५) गद्‌दार गटातून येणारी माणसे हिंदुहृदयसम्राट वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील निष्ठेसाठी व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रेमापोटी संघटनेत येत असतील तर त्यांच्या पापाचे परिक्षालन-परिमार्जन आणि त्यांचे खरे उद्देश सिद्ध करण्यासाठी त्याना पुढील एक वर्ष संघटनेचे कुठलेही पद देण्यात येऊ नये व येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीत पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांचा विचार करण्यात येऊ नये,” असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

प्रवेश झाला आता काम करू

यासंदर्भात ‘हिंदुस्थान पोस्ट’ने जिल्हाप्रमुख भोईर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पत्र लिहिल्याचे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, “हा आमचा पक्षांतर्गत विषय आहे. आमच्या भावना उद्धव ठाकरे यांना कळवल्या आहेत. तारे यांचा पक्षात प्रवेश झाला असल्याने आता आम्ही तारे यांच्यासाठी काम करू.” (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.