RSS च्या सहकार्याने महाराष्ट्रात ‘१०० पार’चा निर्धार

124
RSS च्या सहकार्याने महाराष्ट्रात ‘१०० पार’चा निर्धार
  • खास प्रतिनिधी 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपामध्ये समेट झाला असून राज्याच्या विधानसभा निवडणुकीत ‘आरएसएस’ (RSS) पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. ‘आरएसएस’ (RSS) असहकार’मुळेच भाजपाचे देशात ‘४०० पार’चे गणित साफ बिघडले मात्र महाराष्ट्रात आता ‘आरएसएस’ (RSS) सहकार्यातून ‘१०० पार’चा निर्धार करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

भाजपा अध्यक्षांनी डिवचले

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ‘भाजपा आता स्वयंपूर्ण पक्ष बनला असून स्वतःचा कार्यभार स्वतः सांभाळू शकतो’ असे विधान केले करून ‘आरएसएस’ला डिवचले. त्यानंतर ‘आरएसएस’ आणि भाजपामध्ये तणाव वाढला आणि ‘आरएसएस’ने निवडणूक प्रक्रियातून काढता पाय घेतला. याचा फटका पक्षाला अनेक राज्यात बसला. ‘४०० पार’चे स्वप्न पाहणाऱ्या भाजपाला २४० पुढे जाता आले नाही. पंतप्रधान यांना तिसऱ्यावेळी पूर्ण बहुमत मिळाले नाही.

(हेही वाचा – कर्नाटकात ED,CBI ला तपासासाठी घ्यावी लागणार राज्य सरकारची परवानगी)

रेशीमबागेत भेटीगाठी

त्यानंतर पक्षाने ‘आरएसएस’ची समजूत काढत मातृसंस्थेशी सूत जुळवून घेतले. काही दिवसांपूर्वी दक्षिणेत ‘आरएसएस’चे अधिवेशन झाले. त्यातही भाजपा-‘आरएसएस’च्या संबंधावर ऊहापोह झाला. उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘आरएसएस’ पदाधिकाऱ्यांची नागपूरला रेशीमबागेत जाऊन भेटीगाठी घेऊन समेट घडवून आणला. त्यामुळे या विधानसभेला ‘आरएसएस’ पूर्ण ताकदीने आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या हातात हात घालून काम करेल, असे ठरले आहे.

मुखपत्रातून टीका

‘द ऑर्गनायझर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातून संघाचे ज्येष्ठ संशोधक रतन शारदा यांनी अजित पवार यांना सोबत घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त करत या हातमिळवणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी युती करून भाजपा उत्तम कामगिरी करत असताना अजित पवार यांना सरकारमध्ये सामावून घेण्याची काय गरज होती? असा सुर या लेखात होता. त्यानंतर भाजपाचे मुखपत्र असलेल्या मराठी साप्ताहिक ‘विवेक’मध्येही अजित पवार यांच्याबाबत त्याच धर्तीवर विचार मांडण्यात आले होते.

(हेही वाचा – महिला सक्षमीकरणात बचत गटांचा मोठा वाटा – Sudhir Mungantiwar)

योजनेचे श्रेय घ्या

‘आरएसएस’ची आजही तीच भूमिका कायम असून अजित पवार यांना महायुतीतून बाहेर करून शिवसेना-भाजपा युतीने निवडणुकीला सामोरे जावे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भाजपाने ‘लाडकी बहीण’ या योजनेसह अन्य योजनांचे श्रेय स्वतःकडे घेऊन प्रचार करावा, असा मतप्रवाह ‘आरएसएस’मध्ये असल्याचे सांगण्यात आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.