मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार – नितीन गडकरी

109

मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार, ज्यामुळे महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी पनवेल तालुक्यातील खारपाडा येथे केले.

कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू (लांबी ४२.३०० कि.मी. आणि मूल्य २५१.९६ कोटी) या रस्त्याचे काँक्रिटीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डीडी राजेवाडी फाटा ते वरंध गाव (लांबी १३ कि.मी. आणि मूल्य १२६.७३ कोटी) व राष्ट्रीय महामार्ग क्र.९६५ डीडी वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द (लांबी ८.६० कि.मी. आणि मूल्य ३५.९९ कोटी ) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण ६३.९०० किलोमीटर लांबी व एकूण ४१४.६८ कोटी मूल्य असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम त्यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझाजवळ, खारपाडा गाव,ता.पनवेल येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, भूसंपादन, परवानग्या, कंत्राटदारांच्या अडचणी यासारख्या समस्यांमुळे कोकण विभागातील अनेक कामांना अनंत अडचणी येत होत्या, मात्र आता भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही जबाबदारी स्वीकारली आहे.

यावेळी त्यांनी १३,००० कोटी रुपयांच्या मोरबे-करंजाडे रस्त्याच्या बांधकामाची घोषणा केली, जो जवाहरलाल नेहरू बंदरातून जाईल आणि मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ १२ तासांपर्यंत कमी करेल. १,२०० कोटी रुपयांच्या कळंबोली जंक्शन आणि १,१४६ कोटी रुपयांच्या पागोटे जंक्शनचे कामही लवकरच सुरू होईल, असेही ते म्हणाले.

पुढे गडकरी म्हणाले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे कोकण क्षेत्राच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. मुंबई-गोवा महामार्ग महाराष्ट्राच्या कोकणातील ६६ पर्यटनस्थळांना स्पर्श करतो. त्यातून विकासाला मोठी चालना मिळेल. या महामार्गाचे काम पूर्ण होण्याने कोकणातील फळे आणि इतर उत्पादनांची जलद वाहतूक देखील होईल. त्यातून व्यवसायास चालना मिळेल.

(हेही वाचा – पंतप्रधान मोदी नंबर १; देशातील टॉप १०० मध्ये कोण आहे कोणत्या क्रमांकावर?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.