‘एकच घरात दोन उमेदवाऱ्या’ Mahayuti पुढे नवा पेच

214
BJP ला सरकार स्थापन करण्यास Shiv Sena, NCP चा पाठिंबा; फडणविसांचा मार्ग मोकळा!
  • सुजित महामुलकर

महाविकास आघाडीत काँग्रेस-शिवसेना उबाठा या दोन पक्षांमध्ये जागावाटापावरून वाद सुरू झाला आहे तर महायुतीत (Mahayuti) एक नवीनच पेच निर्माण झाला आहे. ‘एकाच घरात दोन उमेदवाऱ्या’ कशा द्यायच्या ही डोकेदुखी सतावू लागली आहे. आता यावर महायुती काय आणि कसा तोडगा काढते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

नवे ‘नरेटीव्ह सेट’ होईल

नगर जिल्ह्यात विखे-पाटील कुटुंबाचा दबदबा असला तरी मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत विखे कुटुंबातील सुजय यांना पराभवाची चव चाखावी लागली. त्यामुळे सुजय यांनी आपला मोर्चा लोकसभेकडून विधानसभेकडे वळवल्याचे दिसले. मात्र शिर्डी विधानसभा मतदारसंघात सुजय यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील आमदार असून ते पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. तर सुजय यांनीही संगमनेर या मतदारसंघातून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात लढण्याची तयारी केली होती. दरम्यान, एकाच घरात दोन उमेदवाऱ्या दिल्यास राज्यात वेगळे ‘नरेटीव्ह सेट’ होण्यास कारणीभूत ठरेल, यासाठी सुजय यांना विधानसभेला तिकीट न देता त्यांचे वेगळ्या मार्गाने पुनर्वसन करण्याचे आश्वासन पक्षाने दिल्याचे कळते.

(हेही वाचा – Fraud : माजी राज्यसभा खासदार यांची एका कथित वकिलाकडून फसवणूक)

‘घराणेशाही’चा मुद्दा ‘वाजला’ तर..

सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र, भाजपाचे कणकवलीचे आमदार नितेश राणे तसेच माजी खासदार निलेश राणे हे विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. नितेश हे कणकवलीतून तर निलेश हे कुडाळ मतदारसंघातून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपाची अडचण झाली असून निलेश यांना शिवसेना (शिंदे) यांच्या पक्षातून निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मात्र पक्ष बदलला तरी दोन्ही उमेदवार महायुतीचेच असतील. त्यामुळे विरोधी पक्षाकडून प्रचारात ‘घराणेशाही’चा मुद्दा ‘वाजला’ तर महायुतीला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Mahayuti)

.. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

नवी मुंबईतही ऐरोलीचे भाजपाचे आमदार गणेश नाईक यांना त्यांचे पुत्र संदीप नाईक यांच्यासाठी बेलापूर मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी हवी आहे. मात्र, ‘एका घरात एक उमेदवार’ या न्यायाने त्यांनाही पक्षाने एकच, ऐरोलीचे, तिकीट देण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. त्यामुळे संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) गोटात जाऊन बेलापूरमधून निवडणूक रिंगणात उतरतील, अशी चर्चा जिल्ह्यात होत आहे.

(हेही वाचा – Gold Prices : दिवाळीच्या दिवसांत सोन्याला पुन्हा झळाळी; सोने ८०,००० रुपयांच्या जवळ)

वाद उफाळण्याआधीच शमवला

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतही हाच वाद उफळण्याची चिन्हे होती. विद्यमान मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे पुत्र समीर यांच्यासाठी लोकसभेला जोर लावला मात्र भाजपाच्या दिल्लीतील नेतृत्वाने समीर यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हा पेच निर्माण होऊ नये म्हणून कदाचित, छगन भुजबळ यांचे पुतणे पंकज यांची वर्णी राज्यपाल नियुक्त सात आमदारांमध्ये लावून वाद उफाळण्याआधीच शमवण्यात महायुतीला यश आले. (Mahayuti)

मुंबईतही हाच वाद

भुजबळ कुटुंबाचा वाद शमवला तरी राष्ट्रवादीतील आणखी एक नेते, अणुशक्ती नगरचे आमदार नवाब मलिक तसेच त्यांची कन्या सना यादेखील विधानसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. नवाब मलिक हे अणुशक्ती नगरमधून पुन्हा नशीब आजमावण्याच्या तयारीत असून त्यांची कन्या सना यांना चेंबूर मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.

(हेही वाचा – Mahavikas Aghadi मध्ये बिघाडी सुरू; काँग्रेस-उबाठा बोलणी बंद)

पक्ष वेगळे तरी लोक साथ देतील?

महायुतीतील आणखी एक घटक पक्ष ‘युवा स्वाभिमान पक्ष’ प्रमुख रवी राणा यांच्या घरात दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे बडनेरा मतदार संघातील आमदार रवी राणा स्वतःच्या पक्षाकडून महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची शक्यता आहे तर लोकसभेला भाजपामध्ये प्रवेश करून अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या त्यांच्या पत्नी नवनीत राणा यादेखील आता विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. दोन वेगळे पक्ष असले तरी महायुतीचा भाग असल्याने जनता त्यांना किती साथ देईल, हे येणारा काळच ठरवेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.