Mahayuti च्या कोणत्या जागांवर खरी रस्सीखेच, कुरघोडी होणार?

86
Mahayuti च्या कोणत्या जागांवर खरी रस्सीखेच, कुरघोडी होणार?

राज्यातील सत्ताधारी महायुतीत विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली असून १७३ जागांवर एकमत झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र एकमत झालेल्या या जागा कोणताही वाद नसलेल्या असून खरी रस्सीखेच यापुढे होणाऱ्या जागांवर असेल, असे समजते. (Mahayuti)

सर्वाधिक जागा भाजपाला

महायुतीतील भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्यात जागावाटपाची चर्चा झाली आणि विद्यमान आमदार असलेल्या जागांवर, म्हणजेच वाद नसलेल्या १७३ जागांवर एकमत झाले. सध्या राज्यात भाजपाचे १०३ आमदार असून शिवसेना (शिंदे) यांचे ३७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे ३९ आमदार आहेत. यातील जवळपास ९०-९५ जागा या भाजपाच्या वाट्याला आल्या असून शिवसेना (शिंदे) ३५-४० आणि अजित पवार यांना ३०-३५ असल्याचे सांगण्यात आले.

(हेही वाचा – MSRTC च्या ताफ्यात आतापर्यंत केवळ ६५ ई-बसगाड्या दाखल; दिरंगाईमुळे कंत्राट रद्द करण्याची मागणी)

कोणती जागा कोणाच्या वाट्याला

उर्वरित ११५ जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उबाठाचे विद्यमान आमदार असलेल्या आहेत तसेच काही अदलाबदली करण्याची गरज असलेल्या जागाही यात समाविष्ट असल्याचे समजते. त्यामुळे यातील कोणती जागा कोणाच्या वाट्याला येणार यावर महायुतीतील घटक पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. (Mahayuti)

जागावाटप सूत्र

एकूण २८८ पैकी किमान १५० जागांवर भाजपा आपले उमेदवार उभे करणार असून उर्वरित १३८ जागांपैकी ६५-७० शिवसेना (शिंदे) यांना तर ५०-५५ जागी अजित पवार यांचे उमेदवार लढवतील, असे सूत्र ठरले असल्याचे सांगण्यात आले. तसेच यातील १०-१२ जागा या लहान घटक पक्षांसाठी सोडण्यात येणार असल्यावरही पुढे चर्चा होईल, असे कळते.

(हेही वाचा – Congress मध्ये संधी देण्यासाठी केले जाते लैंगिक शोषण; काँग्रेसच्या महिला नेत्याने केलेल्या गंभीर आरोपामुळे राजकरणात खळबळ)

वादग्रस्त जागा

त्यामुळे १७३ जागांवर एकमत झाले असले तरी उर्वरित जागांसाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच, दावा-प्रतिदावा, ठराविक नेत्यासाठी जागेचा आग्रह, अदलाबदली आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न होऊन मानापमान नाट्य रंगणार असल्याची चिन्हे आहेत. (Mahayuti)

जिंकून येण्याच्या क्षमतेचा विचार

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी १ सप्टेंबरला पत्रकारांशी बोलताना सांगितले की, येत्या १० दिवसांत महायुतीचे जागा वाटप निश्चित होण्याची शक्यता असून लहान घटक पक्षांचाही विचार केला जाईल. त्याचप्रमाणे कोणता पक्ष कोणती जागा जिंकून आणण्याची क्षमता ठेवतो, याचा विचार जागावाटपात केला जाईल, असे बावनकुळे यांची स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.