मला तोंड उघडायला लावू नका, नाहीतर महाराष्ट्रात स्फोट होतील; संजय राऊतांचा गंभीर इशारा

69

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. आमच्यावर झालेले आरोप खरे आणि तुमच्यावर झालेले आरोप खोटे काय? तुमचे कुटुंब तुरुंगात जाईल, असे पुरावे आमच्याकडे आहेत. मला तोंड उघडायला लावू नका, नाहीतर महाराष्ट्रात स्फोट होतील, असा गंभीर इशाराच खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत सध्या नाशिकमध्ये आहेत. यावेळी प्रसारमाध्यामांशी संवाद साधताना त्यांनी हा इशारा दिला आहे.

बुकींबरोबरच्या फोटोवरुन ठाकरे गट आणि भाजपमध्ये जोरदार हल्लाबोल सुरु आहे. त्याबाबत विचारले असता संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. फोटोचे राजकारण काढले तर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीयांचे कोणाकोणाबरोबर फोटो आहेत, तेही बाहेर येईल. आमच्यावर संस्कार आहेत. कोणाच्याही कुटुंबापर्यंत जायचे नाही. कुटुंबाला त्रास होईल, कुटुंबातील कोणी तुरुंगात जाईल, असे दळभद्री राजकारण आम्ही केले नाही, पण ही कटुता फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणली. केंद्रात मोदी आणि शाह यांनी आणली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

( हेही वाचा: भाजप- शिवसेनेचे जागा वाटप झालेले नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण )

आमच्यावरचे आरोप खरे, तुमचे खोटे काय? 

आजही एकनाथ खडसे यांचे जावई तुरुंगात आहेत. त्याचे उत्तर महाजन, फडणवीस यांनी दिले पाहिजे. आम्ही तुरुंगात गेलो. देशमुख तुरुंगात गेले. मलिक तुरुंगात आहेत. काय कारणं काय आहेत? आमच्यावर आरोप होतात ते खरे. तुमच्यावरील आरोप खोटे का? तुमचेही कुटुंब तुरुंगात जातील, असे पुरावे आमच्याकडे आहेत. पण तुमच्या कुटुंबापर्यंत जाणार नाही. आम्हाला तोडं उघडायला लावू नका, महाराष्ट्रात स्फोट होतील, असा धमकीवजा इशाराच राऊत यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.