मनसेतून ठाकरे गटात आलेले सर्व माजी नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात

36

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खऱ्या शिवसेनेची मान्यता मिळाल्यानंतर उध्दव ठाकरे यांची साथ सोडून आता एक एक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश घेत चालले आहे. आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभेतील माजी नगरसेवक असलेले दत्ता नरवणकर यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंचाचा हात पकडला आहे. त्यामुळे आधी माजी नगरसेवक व आमदार दिलीप लांडे, माजी नगरसेवक परमेश्वर कदम यांच्या पाठोपाठ दत्ता नरवणकर हेही शिवसेनेत गेल्यामुळे ठाकरे गटाच्या पक्षाकडे राहिलेल्या त्यांच्या उर्वरीत सहकाऱ्यांकडे आता संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे.

( हेही वाचा : शेतकऱ्यांनी लाँगमार्च आंदोलन थांबवावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन )

मुंबई महापालिकेच्या सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेचे दिलीप लांडे, परमेश्वर कदम, हर्षिला मोरे, अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर, दत्ता नरवणकर व संजय तुर्डे आदी सात नगरसेवक निवडून आले होते. त्यातील संजय तुर्डे वगळता दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली सहा नगरसेवकांनी तत्कालिन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर दिलीप लांडे हे चांदिवली विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले.

मात्र, तत्कालिन शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार, खासदारांसह इतर पदाधिकारी यांच्यासह मोठ्याप्रमाणात गट बाजूला पडल्यानंतर निवडणूक आयोगाने उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे. आता शिवसेना आणि उध्दव ठाकरे गट या दोन गटांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला आपल्या पक्षातील पदाधिकारी सोडून जाणार नाही याची काळजी घ्यावी लागत असून त्यानंतरही काही जण ठाकरेंची साथ सोडून जात आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या विधानसभेतील माजी नगरसेवक संतोष खरात यांच्यानंतर आता दत्ता नरवणकर यांनी शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांपैंकी तीन नगरसेवक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेल्याने त्यांच्यासह तत्कालिन शिवसेनेत प्रवेश केलेल्या इतर सहकारी नगरसेवकांवर पक्षातील नेत्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडून संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. त्यामुळे आज जरी उध्दव ठाकरे यांच्यासोबत हर्षिला मोरे, अश्विनी माटेकर, अर्चना भालेराव, या माजी नगरसेवक व त्यांचे पती असले तरी ते पक्षासोबत किती एक निष्ठेने राहतील याबाबत उध्दव ठाकरे गटातील नेतेच साशंक आहे. त्यामुळे आधीच तीन माजी नगरसेवकांनी शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारल्याने अन्य माजी नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून या संशयाच्या नजरेमुळे हे माजी नगरसेवक उध्दव ठाकरेंसोबत राहणार की साथ सोडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पक्षाशी कितीही एकनिष्ठ असले तरी या संशयाच्या नजरेमुळे हे माजी नगरसेवक आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.