शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कृषिमंत्री अकलेचे तारे तोडत असताना मुख्यमंत्री गप्प का? अजित पवार यांचा सवाल

28
बाजारभाव, अवकाळी पाऊस यामुळे दुहेरी संकटात असणारा शेतकरी नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने तिहेरी संकटात सापडला आहे. त्यात राज्याचे कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नी काहीही‍ विधाने करुन आकलेचे तारे तोडत आहेत. तरीही मुख्यमंत्री गप्प का, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.
पवार म्हणाले, राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत वाढ झाली आहे. पीकांसह, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने राज्याला यलो ॲलर्ट दिला आहे. मात्र राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे, अजूनही अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आलेले नाहीत, राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासन ठप्प आहे.
राज्यात ५, ६ आणि ७ मार्च रोजी अवकाळी पाऊस होऊन सर्वच पिकांचे नुकसान झालेले आहे. राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत. त्यामध्ये पंचनामे करणारे ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यक यांचाही समावेश आहे. त्यामुळे राज्यात नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू झालेले नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. जी आकडेवारी शासन सभागृहात सांगत आहे हे केवळ अंदाजाने आणि कार्यालयात बसून दिलेली आकडेवारी आहे.
शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी अगोदरच आर्थिक विवंचनेत असताना अवकाळी पावसामुळे अस्मानी संकट उभे राहिले आहे. आगामी चार दिवस राज्यात पावसाळी वातावरण राहणार असून २० मार्चपासून संपूर्ण राज्याला यलो अलर्ट तर ११ जिल्ह्यांना ऑरेज ॲलर्ट देण्यात आलेला आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे ‘अवकाळीने शेतीचे फार नुकसान झालेले नाही’ अशी वक्तव्ये करुन आकलेचे तारे तोडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तातडीने सुरू करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

हे शेतकऱ्यांचे सरकार – मुख्यमंत्री

अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अवकाळीचे पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना तात्काळ मदत देणार. नियम, निकषांपेक्षा अधिक मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.