Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात ऐतिहासिक ‘रणसंग्रामा’ला सुरुवात!

69
Maharashtra Assembly Election : जागावाटपात मविआत पवारांची राष्ट्रवादी तर महायुतीमध्ये भाजपाने मारली बाजी
सुजित महामुलकर

दसरा झाला आणि आता राज्यातील सर्वसामान्य जनतेला चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीचे वेध लागले आहेत. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांनी लोकसभेचा ‘महारणसंग्राम’ झाल्यानंतर राज्यातील ‘रणसंग्राम’ लढण्यासाठी शस्त्रांना धार करून ठेवली आहे. दिवाळी झाली की, हा विधानसभा निवडणुकीचा ‘रणसंग्राम’ खऱ्या अर्थाने सुरू होईल. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आणि महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून कधीही पाहिली नाही, अशी ही ऐतिहासिक निवडणूक होणार आहे, ज्याला अनेक कंगोरे आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

राजकीय आघाड्यांची ‘खिचडी’

या निवडणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे चार-पाच प्रमुख राजकीय पक्षांची संख्या आता जवळपास ८-९ झाली आहे, तर दोन-तीन युती-आघाड्यांच्या जागी आता पाच-सहा आघाड्या या वेळी मैदानात असतील. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (Congress) एकाचे दोन पक्ष झाले आणि ते एकमेकांच्या विरोधात असलेल्या युती-आघाडीत जाऊन बसले. याशिवाय राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष हे दोनच पक्ष राज्यात असावे की, जे कोणत्याही युती-आघाडीत (अधिकृतपणे) समाविष्ट नाहीत. उमेदवार पाडणे आणि इतरांची मते ‘खाण्या’साठी प्रसिद्ध असलेली वंचित बहुजन आघाडी नेहमीप्रमाणे रिंगणात आहेच. याव्यतिरिक्त युती-आघाडीतील नाराज असलेले प्रहार जनशक्ती (बच्चू कडू), स्वराज पक्ष (छत्रपती संभाजीराजे) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना (राजू शेट्टी) यांनी तिसरी ‘परिवर्तन महाशक्ती’ आघाडी स्थापन केली. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि नव्याने उदयास आलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही जातीचे कार्ड खेळत राजकारण करण्याची तयारी केली आहे.

(हेही वाचा – Vasubaras 2024 : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात रांगोळीच्या रूपात अवतरली कामधेनू )

बंडखोरीचा उच्चांक

उमेदवारी अर्ज भरून आता अर्ज मागे घेण्याची वेळ आली असूनही प्रमुख प्रतिस्पर्धी महायुती आणि महाविकास आघाडीतील शेवटपर्यंत जागावाटप ताटकळत राहिल्याने कुंपणावर असलेल्यांनी अंदाज घेत इतरत्र उड्या मारल्या, तर काही अजूनही एक पाऊल मागे-पुढे ठेऊन आहेत. बंडखोरी करणाऱ्यांमध्येही सर्वपक्षीयांचा समावेश असल्याचे या वेळी प्रकर्षाने जाणवत आहे. पक्ष बदल करून २३ तास होत नाहीत, तोच त्यांना निवडणूक तिकीटही देऊन ‘सन्मानित’ करण्यात येत असल्याने बंडखोरीला आळा बसण्याऐवजी मोठ्या राजकीय पक्षांकडूनच अप्रत्यक्ष ‘प्रोत्साहन’ मिळत आहे. उदाहरणार्थ बेलापूरचे भाजपा नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक (Sandeep Naik) यांनी भाजपाकडून तिकीट नाकारताच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि काही मिनिटांतच त्यांची उमेदवारी घोषित झाली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील राजेंद्र शिंगणे यांनीही शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षात प्रवेश केला आणि काही तासात तिकीट पदरात पाडून घेतले. महायुतीचा भाग असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील छगन भुजबळ यांचे पुतणे आणि मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष समीर भुजबळ यांनी तिकीट मिळत नाही म्हटल्यावर महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष लढण्याची तयारी केली. याशिवाय बंडखोरी करण्यामागे अनेकांचे अनेक ‘अर्थ’ काढता येतात. (Maharashtra Assembly Election 2024)

नातेवाईकांची मांदियाळी

या निवडणुकीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे नातेवाईकांची मांदियाळी. यापूर्वी उमेदवार यादीत इतक्या मोठ्या प्रमाणावर राजकीय नेत्यांच्या नातेवाइकांची संख्या नव्हती आणि विशेष म्हणजे ‘घराणेशाही’चा आरोप करणाऱ्या पक्षांतही घराणेशाही पाहावयास मिळत आहे, भले ‘घराणेशाही’ची त्यांची व्याख्या वेगळी असावी. सर्वसामान्यांसाठी राजकीय नेत्याचा नातू, पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण, भाचा, पुतण्या, पुतणी, सून, जावई ही नाती घराणेशाहीमध्येच मोडतात. पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरणारी ठळक उदाहरणे द्यायची झालीच, तर आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई, राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित, शरद पवारांचे नातू युगेंद्र, वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती यांची नावे घ्यावी लागतील.

(हेही वाचा – IndiGo Flight : इंडिगोच्या पुणे-जोधपूर विमानांना पुन्हा एकदा बॉम्बची धमकी)

किंगमेकर बनण्याची लालसा

महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष सोडल्यास अन्य पक्ष आणि आघाड्यांना किमान १५-२५ जागा जिंकण्याची महत्वाकांक्षा असून त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास ‘किंग मेकर’ बनून मोठा लाभ पदरात पाडून घेण्याची लालसा उत्पन्न झाल्याचे चित्र दिसत आहे. राज ठाकरे यांनी तर आधीच जाहीर केले आहे की, त्यांचा पक्ष हा सत्तेत असेल. तशीच काहीशी अपेक्षा ‘परिवर्तन महाशक्ती’ची असून मनोज जरांगे यांचेही ‘किंग मेकर’ बनण्याचे स्वप्न लपून राहिलेले नाही.

मुख्यमंत्रीपदाचे ‘मृगजळ’

आतापर्यंत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार, यावर इतकी चर्चा कधीच झाली नव्हती. ज्या पक्षाच्या अधिक जागा त्याचा मुख्यमंत्री हे साधे-सोपे गणित होते. गेल्या निवडणुकीनंतर (२०१९) उद्धव ठाकरे यांनी ‘मुख्यमंत्री’ पदाला खऱ्या अर्थाने ‘अहंकार’ मिळवून दिला आणि महायुतीत फुटीची बीजे रोवली. यामुळे आता उद्धव ठाकरे सहभागी असलेल्या महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांचे उमेदवार निवडून आणण्याऐवजी पाडापाडीवर अधिक लक्ष केंद्रित करतील, याचीच शक्यता अधिक वाटते. महायुतीतही मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच दिसून येते; मात्र या पदासाठी इर्शेने पेटून उठल्याचे चित्र जनतेसमोर तरी दिसत नाही. लोकसभेनंतर महाविकास आघाडीसाठी राज्यात पोषक वातावरण असताना मुख्यमंत्रीपदाच्या ‘मृगजळा’मागे धावत निघालेल्या शिवसेना उबाठाने काँग्रेस-राष्ट्रवादी (शप) पक्षांनाही आपल्या मागे फरपटत नेत नकळत सत्तेच्या मार्गावरून दिशाहीन केल्याचे चित्र दिसत आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.