Mahavikas Aghadi मध्ये बिघाडी सुरू; काँग्रेस-उबाठा बोलणी बंद

159
Maharashtra Assembly Poll : नाना पटोले मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतूनच बाहेर!
  • खास प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. महायुतीचे जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यावर आले आणि उद्या पहिली यादी प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर असतानाच महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मात्र बिघाडी झाल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना उबाठा आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वाद विस्तव जात नाही. आता तर उबाठाने काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांशी चर्चा न करण्याचा निर्णय घेतला असून लोकसभेप्रमाणे थेट दिल्ली हायकमांडशी चर्चा करण्याचा इशारा उबाठाने दिला आहे.

नऊ तास चर्चा, तोडगा नाही

शुक्रवारी १८ ऑक्टोबरला सकाळी शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसवर हल्लाबोल करत आता थेट राहुल गांधी यांच्याशी जागावाटपाची बोलणी करणार असल्याची भूमिका घेतली. गुरुवारी १७ ऑक्टोबरला महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांची सुमारे ९ तास चर्चा झाली मात्र तोडगा काही निघू शकला नाही. राऊत यांचा रोख हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर असून ते बैठकीला असतील तर उबाठा हजार राहणार नाही, अशी भूमिका घेतल्याचे समजते.

काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यातील वाद हा विदर्भातील जागांवरून सुरू झाला असून तो आता विकोपाला जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

(हेही वाचा – बालविवाह रोखण्यासाठी जागरूकता हवी, कायद्यात अनेक त्रुटी; Supreme Court नेमकं काय म्हणालं?)

राहुल गांधी यांच्याशी चर्चा

“राज्यातील जागावाटपाला गती मिळावी, यासाठी शुक्रवारी सकाळी आपली मुकुल वासनिक यांच्यासह काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशीही आपली चर्चा होणार आहे. अनेक जागांबाबत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) निर्णय झाला तर काही जागांबाबत अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही. आता खूप कमी वेळ शिल्लक आहे. राज्यातील नेत्यांना त्यांची यादी दिल्लीकडे पक्षश्रेष्ठींना पाठवावी लागते. त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येतो,” अशा शब्दांत राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीवेळीही राऊत आणि काँग्रेसचे राज्यातील नेते यांच्यात समन्वय नसल्याने शिवसेना उबाठा नियमितपणे हायकमांडशी बोलण्याची धमकी देत होते, पुन्हा तीच खेळी शिवसेना उबाठाने सुरू केल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

(हेही वाचा – मुंबईत माजी महापौर Datta Dalvi यांना फेरीवाल्यांकडून शिवीगाळ )

काँग्रेसचे वेळकाढू धोरण

“महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) २०० पेक्षा जास्त जागांवर सहमती झाली आहे. काही जागांचा पेच अद्याप आहे. मात्र, महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मात्र, काही जागांवर तिन्ही पक्षांकडून दावा सांगण्यात आला आल्यामुळे याबाबत आम्ही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी दिल्लीत चर्चा केली. तसेच शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांनी बैठकीतील आतापर्यंतच्या घडामोडींची माहिती दिली. त्यांनी आपल्याला काही सूचना केल्या आहेत. त्याचे आपण पालन करू. काही जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही. तो पेच लवकरच सुटेल आणि राज्यातील जागावाटपाचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल,” असे राऊत यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.