बाळासाहेब थोरातांकडून मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक!, म्हणाले..

76

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांची सत्ता येऊन नऊ महिने झाले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सतत शिंदे-फडणवीस लवकर पडणार असल्याची विधान केली जात आहेत. असे असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांनी आपल्या मनातील सल बोलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक केले आहे.

शनिवारी नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादाजी भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारतीताई पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार प्रितम मुंडे, खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री छगनराव भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजाताई मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. याच कार्यक्रमात बाळासाहेब थोरात बोलत होते.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘शिंदे साहेब आपण मुख्यमंत्री आहेत. संधी मिळालेली आहे. काम करतायत. आमची संधी घालवली आहे, हे खरंय. पण गडी मेहनती आहे हे विसरुन जाता येत नाही. जो काही वेळ मिळाला असेल, जी संधी मिळाली असेल ती जास्तीत जास्ती लोकांपर्यंत काम करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय हे आम्ही मनापासून पाहतो आहोत आणि हे नाकारता येत नाही.’

‘आणि हे सगळे काही आहे, ते शेवटी लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याकरिता आपण करत असतो. तो आनंद निर्माण करण्याची जबाबादारी लोकशाहीने सर्व पक्षांना दिली तशी आपल्यावरही दिलेली आहे. शेवट ते काम आपण एकत्रित करणे हेच महत्त्वाचे आहे. आणि त्यामध्ये आदरणीय गोपीनाथ मुंडे यांचा आदर्श आपल्या पुढे असला पाहिजे, पंकजा ताई त्यांचा समर्थ वारसा पुढे नेत आहेत याचे आम्हाला कौतुक आहे,’ असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

(हेही वाचा – शिंदे-भाजपसोबत युती नाही, फक्त पाठिंबा; जागावाटपावरील बावनकुळेंच्या वक्तव्यावर बच्चू कडूंचे खळबळजनक विधान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.