शिवसेना भवनाच्या अंगणात उभे राहणार शेलार?

शेलारांनी आपला मोर्चा आता पश्चिम उपनगरांतून शहराच्या दिशेने वळवला असून आगामी विधानसभा निवडणुकीत ते दादर-माहिम विधानसभा मतदार संघातून नशीब आजमवण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीकोनातून शेलारांनी अप्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली असून सेनाभवनाच्या अंगणात निवडणूक लढवण्याची त्यांची मागील अनेक वर्षांची इच्छा आहे.

245

विशेष प्रतिनिधी – सचिन धानजी

भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार(ashish shelar) सलग दोन वेळा वांद्रे पश्चिम विधानसभेतून निवडून आले असले तरी या मतदार संघातून निवडून येत हॅट्रिक साधण्याची हिंमत मात्र ते दाखवणार नसल्याचे दिसून येत आहे. या मतदार संघातून आपण तिसऱ्यांदा निवडून हॅट्रिक साधू शकतो याबाबत खुद्द शेलारच साशंक आहेत. त्यामुळे शेलारांनी आपला मोर्चा आता पश्चिम उपनगरांतून शहराच्या दिशेने वळवला असून आगामी विधानसभा निवडणुकीत ते दादर-माहिम विधानसभा मतदार संघातून नशीब आजमवण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीकोनातून शेलारांनी अप्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली असून सेनाभवनाच्या अंगणात निवडणूक लढवण्याची त्यांची मागील अनेक वर्षांची इच्छा आहे. त्यामुळे या मतदार संघातून निवडून लढत शेलार आपली इच्छा पूर्ण करत दादरमध्ये कमळ फुलवणार का असा प्रश्न उपस्थित आहे.

( हेही वाचा : …तर मी एक मिनिटही मंत्री राहणार नाही: राऊतांच्या ४०० कोटींच्या आरोपावर गुलाबराव पाटलांचे आव्हान )

भाजपचे अॅड. आशिष शेलार(ashish shelar) हे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम मतदार संघातून प्रथम निवडणूक लढले होते, परंतु त्यावेळी त्यांचा सुमारे १७०० मतांनी पराभव झाला. काँग्रेसचे बाबा सिध्दिकी यांनी त्यांचा पराभव केला होता. परंतु या पराभवाचा वचपा त्यांनी २०१४च्या निवडणुकीत घेतला. युतीशिवाय लढलेल्या या निवडणुकीत भाजपचे शेलार यांनी तब्बल ७४ हजार ७७९ मते मिळवत विजय मिळवत काँग्रेसच्या सिद्दीकी यांचा ३० हजार मतांनी पराभव केला होता. तर शिवसेनेच्या विलास चावरी यांना १४ हजार मते मिळाली होती. परंतु सन २०१९च्या निवडणुकीत भाजप शिवसेना युतीमध्ये लढणाऱ्या अॅड. शेलारांना या मतदार संघात मागील निवडणुकीच्या तुलनेत केवळ ३७ मतांची वाढ होत ७४ हजार ८१६ मते मिळाली होती. तर काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांना ४८ हजार ३०९ मते मिळाली होती. त्यामुळे युती असूनही २०१४ च्या तुलनेत २०१९मध्ये शेलारांच्या मतांमध्ये वाढ झालेली नसून शिवसेनेची ही नक्की मते गेली कुठे हा प्रश्न आहे.

New Project 81

आशिष शेलार(ashish shelar) यांची नजर आता दादर-माहिम विधानसभा मतदार संघाकडे

मात्र, मागील काही काळापासून भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा प्रखर केला असून या वाढत्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून या मतदार संघातील मुस्लिम आणि ख्रिश्चन बहुल लोकवस्तीतील मते आपल्या पारड्यात पडण्याचे प्रमाण कमी होण्याची भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळे शेलारांनी आपली नजर आता दादर-माहिम विधानसभा मतदार संघाकडे वळवली असल्याचे बोलले जात आहे. आशिष शेलार(ashish shelar) यांनी काही महिन्यांपूर्वी या दादरमधील फेरीवाल्यांच्या मुद्द्याला हात घालत आंदोलन केले होते. तसेच माहिम दादर परिसरातील कोणत्याही कार्यक्रमाला जाणे ते टाळत नसून आवर्जुन उपस्थिती दर्शवत असतात. त्यातच शिवाजीपार्क परिसरात त्यांच्या नावाच्या कचरा पेट्या फिरल्या जात आहे. या कचरा पेट्या महापालिकेच्या सफाई कामगारांकडे असून जी उत्तर विभागातील सफाई कामगारांकडे एच पश्चिम विभागातील कचरा पेट्या आहे. आमदार असलेल्या शेलार यांनी म्हाडाच्या निधीतून या कचरा पेट्या आपल्या विधानसभा मतदार संघासाठी उपलब्ध करून घेतल्या आहे. परंतु या कचरा पेट्या चक्क शिवाजीपार्कमध्ये वापरल्या जात आहे. त्यामुळे या माध्यमातून एकप्रकारे शेलारांचा प्रचारच केला जात आहे.

या विधानसभा मतदार संघाचे आमदार सदा सरवणकर हे असले तरी शिवसेना फुटल्यानंतर ते शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गेले आहे. वयोमान आणि आरोग्याचा विचार करता शिवसेना आणि भाजप युतीमध्ये हा मतदार संघ भाजपला सोडून सरवणकर यांची वर्णी विधान परिषदेवर लावली जाण्याची रणनिती असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या विधानसभा मतदार संघात महापालिका निवडणुकीत भाजपपेक्षा शिवसेनेला जास्त जागा सोडल्या जाणार असल्याचेही बोलले जात आहे.

दादर माहिम विधानसभेची जबाबदारी ही सध्या शेलार यांचे कट्टर समर्थक असलेले आणि मुंबई भाजपचे सचिव जितेंद्र राऊत आणि विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांच्याकडे आहे. त्यामुळे या मतदार संघात शेलार यांचा हा गट बराच सक्रीय आहे. २०१४च्या निवडणुकीत शेलार यांनी आपण माहिम दादर विधानसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे अप्रत्यक्ष इच्छा माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर व्यक्त केली हेाती. त्यामुळे आगामी निवडणुकीत हा योग जुळवून आण्ण्यासाठी शेलार आणि त्यांचे समर्थक जोरात कामाला लागल्याचे दिसून येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.