Badlapur School Case : पालकांचे आंदोलन हायजॅक; बदलापूर स्थानकातील ‘रेल रोको’मध्ये राजकीय घुसखोरी? 

सायंकाळच्या वेळी बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळावर उरलेले आंदोलनकर्ते ५० ते ६० च्या संख्येने उरलेले होते, आणि हे आंदोलक रेल्वे पोलीस, प्रशासन यांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतेच त्यांना आंदोलनाला हिंसक बनवायचे होते.

191

बदलापूर रेल्वे स्थानकावर तब्बल १० तास  सुरू असलेले रेल रोको आंदोलनाला संशयाचा वास येऊ लागला आहे. बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या (Badlapur School Case) नावाखाली मंगळवारी झालेल्या या आंदोलनाला नक्की कुणाचे पाठबळ होते का? या आंदोलनाचा फायदा नक्की कोणाला होणार होता का? याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी काही हिंसक आंदोलकांना ताब्यात घेऊन चौकशी देखील सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शाळेनंतर आंदोलक रेल्वे स्थानकावर आले 

बदलापूर येथील एका खासगी शाळेत दोन चिमुरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या (Badlapur School Case) संतापजनक घटनेचे पडसाद मंगळवारी बदलापूर शहरात उमटले होते. सकाळी ७ वाजता आंदोलकांनी या घटनेला घेऊन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अथवा त्याला सर्वांसमोर फाशीवर लटकवा, अशी मागणी करत आंदोलकांनी ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेला मंगळवारी सकाळी लक्ष्य केले. जवळपास ५०० जणांचा जमाव हातात बॅनर, पोस्टर घेऊन शाळेचा गेट तोडून आत शिरले आणि त्यांनी शाळेत तोडफोड सुरू केली. पोलिसांनी या आंदोलकांना शाळेतून पिटाळून लावल्यानंतर या आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकावर वळवला. सकाळी ८ वाजता रेल्वे स्थानकात आलेल्या या आंदोलकांनी रेल्वे रुळावर उतरून रेल रोको आंदोलन सुरू केले.

आंदोलनात हिंसक आंदोलकांचा समावेश 

यावेळी जवळपास एक ते दीड हजार जणांचा जमाव रेल्वे रूळ, तसेच फलाटावर उभे राहून घोषणा देत होता. अनेकांचे हातात पोस्टर, बॅनर, फास तयार केलेला दोरखंड घेऊन रेल्वे रुळावर उतरलेल्या आंदोलनामध्ये रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराला वैतागलेले प्रवाशीदेखील सामील झाले होते. सकाळी सुरू झालेले हे आंदोलन दुपारी काही प्रमाणात निवळत चालले होते, कारण रेल्वे प्रवासी आणि शाळकरी मुले आणि महिलांच्या असुरक्षितेसाठी आंदोलनात सामील झालेल्या सर्वसामान्य आंदोलकांनी २ ते ३ वाजताच्या सुमारास आंदोलनातून काढता पाय घेतला होता. ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात देखील आली होती, या आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्यांवर पोलीस लक्ष ठेवून होते. त्यांनी प्रत्येक सामान्य आंदोलक आणि हिंसक वळण देणारे आंदोलक ओळखल्यामुळे पोलीस प्रशासन सायंकाळपर्यंत शांत होते, सामान्य आंदोलक  बाहेर पडण्याची वाट पोलीस पहात होते.

काही आंदोलक सर्व तयारीनिशी ठरवूनच आलेले 

एका पोलीस अधिकारी यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही  यापूर्वी अनेक आंदोलन, रेल रोको आंदोलन बघितले, परंतु मंगळवारी बदलापूर रेल्वे स्थानकात झालेले आंदोलन वेगळेच होते. या आंदोलनात काही आंदोलक सर्व तयारीनिशी ठरवूनच आले होते. काही जण नशेत देखील होते. पूर्वी होणारे रेल रोको आंदोलन १ ते २ तासापेक्षा अधिक वेळ झालेले नाही, आणि पोलिसांनी समजावल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात देखील आले आहे, परंतु बदलापूर येथे झालेले आंदोलन हे ठरवून केलेले आंदोलन होते. या आंदोलकांना माहीत होते की, आरोपीला लगेच आणि सर्वांसमोर फाशी देऊ शकत नाही. भारतीय न्याय व्यवस्थेत असे कुठलीही तरतूद नसताना आंदोलकांकडून आरोपीला आताच्या आता फाशीवर लटकवा, अशी मागणी केली जात होती. या आंदोलनला हिंसक वळण देण्याचे काम सुरू होते, असे अधिकारी यांनी सांगितले.  (Badlapur School Case

पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले

सायंकाळच्या वेळी बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळावर उरलेले आंदोलनकर्ते ५० ते ६० च्या संख्येने उरलेले होते, आणि हे आंदोलक रेल्वे पोलीस, प्रशासन यांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतेच त्यांना आंदोलनाला हिंसक बनवायचे होते. एका पोलीस अधिकारी यांनी म्हटले आहे. खरे आंदोलक दुपारीच निघून गेले होते, असेही त्या अधिकारी यांनी म्हटले आहे, रेल्वे पोलिसांनी दिवसभर संयम पाळला आणि उरलेल्या आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अखेर बाळाचा वापर करावा लागला, काही क्षणातच हे आंदोलक रेल्वेच्या हद्दीतून बाहेर आले व त्यांनी रस्त्यावर वाहनांची तोडफोड  केली. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले असून वृत्तवाहिन्याचे फुटेज, तसेच रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज, तसेच पोलिसांनी स्वतः तयार केलेल्या व्हिडीओमधून आंदोलकांची ओळख पटवून माहिती काढली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.