Baba Adhav यांचे आत्मक्लेश आंदोलन की प्रति अण्णा हजारे होण्याची खटपट?

95
Baba Adhav यांचे आत्मक्लेश आंदोलन की प्रति अण्णा हजारे होण्याची खटपट?
  • अवधुत वाघ

१९६० ते ७० मध्ये पुणे नगरपालिकेचे डाव्या विचारसरणीचे नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या बाबा आढाव (Baba Adhav) यांचा त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पराभव केला. एक गाव एक पाणवठा सारख्या आता कालबाह्य आंदोलनाचे जनक व पुण्यापुरत्या मर्यादित हमाल व रिक्षा चालकांच्या संघटनांचे नेतृत्व करणारे बाबा आढाव हे शरद पवारांनी फडताळातून बाहेर काढलेले, संपलेल्या डाव्या चळवळीचे अवशेष आहेत. आजच्या तरुण पिढीला माहितही नसलेले व पुण्याबाहेर वावरही नसलेले बाबा आढाव यांचा पत्ता शरद पवारांनी आत्ताच कसा बाहेर काढला हे एक कोडेच आहे. पण प्रती अण्णा हजारे होण्याची संधी शोधत असलेल्या बाबा आढावांकडे ९५ वर्षांची जेष्ठता सोडून कोणताही असेट नाही.

गेल्या ३० वर्षांत कोणतेही आंदोलन न करणारे बाबा आढाव (Baba Adhav) हे जरी एक सन्माननीय व निष्कलंक व्यक्तिमत्त्व असलं तरी निवडणूक संपल्यावर व मविआ हरल्यावर त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न पाहता त्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते. बाबा आढाव यांच्या शरद रंगभूमीवरील या एकांकिकेचे नेपथ्यही खूप रंजक आहे. शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका करुन या नाटकाची नांदी दिली. शाफुआंच्या सरळ रेषेत फुले वाड्यावर नाटकाचा प्रयोग करण्याचे नक्की करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात सहभागी होणाऱ्या आढावांना हमीद व मुक्ता दाभोलकरांच्या चेल्या चपट्यांनी गर्दी करुन प्रोत्साहन देण्याचे ठरले.

(हेही वाचा – Evm Machine : ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरून सुरू असलेल्या सर्व वादांना पूर्णविराम!)

वयोमानानुसार प्रयोग जास्त दिवस लांबविता येणार नाही हे लक्षात घेऊन दुसऱ्याच दिवशी जाणत्या राजाने प्रयोगस्थळी भेट देण्याचे नक्की झाले. माजी मुख्यमंत्री व २० आमदारांचे नेते उद्धव ठाकरे यांनी बाबा आढाव (Baba Adhav) आत्मक्लेश कसे काय करतात ते पाहण्याची इच्छा व्यक्त केली. संजय राऊत यांनी सकाळच्या भोंग्यातून बांग देण्याची हमी घेतली. आणि अशा तऱ्हेने बाबा आढाव यांच्या रूपाने प्रती अण्णा हजारे निर्माण करण्याबाबत पराभूत पक्षांत एकमत झाले. दुर्दैवाने बाबा आढाव यांचे हे आंदोलन प्रायोजित आहे हे सर्वांच्याच लगेचच लक्षात आले व आढावांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपटीबार फोडण्याचा हा पवार प्रकार आहे यात कोणतीही शंका उरली नाही.

समाजवादी विचारसरणीच्या बाबा आढावांनी (Baba Adhav) लाडकी बहीण योजनेत आक्षेप घेणे म्हणजे कल्याणकारी राज्यव्यवस्थेला विरोध करणे होय. आणि यातच त्यांच्या आचारातील व विचारातील विसंगती उघड झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मविआला महाराष्ट्रात मिळालेल्या घवघवीत यशानंतर EVM संदर्भात मूग गिळून बसलेल्या बाबा आढावांना विधानसभेत मविआच्या पराभवानंतर अचानक कसा काय कंठ फुटला हे एक अनाकलनीय कोडे आहे. म्हणूनच ईव्हीएम हॅक झाले म्हणून आंदोलन करणाऱ्या बाबा आढाव यांना मविआने हॅक तर केले नाही ना असा संशय येतो.

लेखक भाजपा महाराष्ट्र राज्य प्रवक्ता आहेत

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.