Assembly Elections : सत्तेसाठी काहीही… मूळ ‘विचारधारा’ की ‘सत्ता’, ‘युती-आघाडी धर्म’ यात गोंधळ

86
Assembly Elections : सत्तेसाठी काहीही... मूळ ‘विचारधारा’ की ‘सत्ता’, ‘युती-आघाडी धर्म’ यात गोंधळ
Assembly Elections : सत्तेसाठी काहीही... मूळ ‘विचारधारा’ की ‘सत्ता’, ‘युती-आघाडी धर्म’ यात गोंधळ
  • सुजित महामुलकर

राजकीय पक्षाची मूळ विचारधारा आणि सत्तेसाठी केलेली तडजोड किंवा सौम्य शब्दांत सांगायचं तर ‘युती-आघाडी धर्म पाळणे’ या विवंचनेत महायुती आणि महाविकास आघाडीतील एक-एक पक्ष अडकलेला दिसत आहे. गेल्या पाच वर्षात ‘सत्तेसाठी काहीही’ अशी भूमिका अजित पवार (Ajit Pawar) यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटाने घेतल्याचे दिसते. ही तडजोड पक्षातील नेत्यांना कितपत आणि किती काळ रुचेल, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडत असेल तर पक्ष प्रमुखांना का नाही पडत?

विचारधारेसाठी उभी फूट

साधारण पाच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सत्तेसाठी, खरं तर मुख्यमंत्री पदासाठी पक्षाची विचारधारा सोडून पारंपरिक विरोधक असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी (एकसंघ) हातमिळवणी केली. सत्ता आली पण अडीच वर्षांत शिवसेना पक्षात उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन बाहेर पडले. नैसर्गिक युती असलेल्या भाजपासोबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात सत्तापालट झाला.

फुटीचे कारण अंतर्गत नाराजी

सगळे सुरळीत सुरू असताना, त्यानंतर साधारण वर्षभरातच राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजीतून पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केले आणि तेही ४० आमदारांना घेऊन बाहेर पडत सेना-भाजपा युतीत सहभागी झाले. या दोन्ही बंडातील मूळ फरक लक्षात घेण्याजोगा आहे. शिंदे यांचे बंड झाले त्याला विधारधारेची किनार होती तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडाला पक्षांतर्गत नाराजी होती.

(हेही वाचा – Kolkata doctor rape case प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून घेतली दखल)

सत्तेसाठी राजकीय तडजोड

सत्तेवर आल्यानंतर सेना-भाजपा आमदारांना एकमेकांवर कुरघोडी करणे सोडले, तर युती म्हणून काम करणे फार जड गेले नाही, कारण दोन्ही पक्षांची विचारधारा एकसारखी आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीच्या येण्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेचा वाटा मिळाला पण ही ‘राजकीय तडजोड’ असल्याचे भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेदेखील उघडपणे मान्य करतात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निरीक्षण
अडीच-तीन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचे परिणाम महायुती आणि महाविकास आघाडीला पाहायला मिळाले. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या येण्याने भाजपाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज झाली आणि त्यांनी निवडणुकीत काम न केल्याचा फटका बसला. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुखपत्रे ‘ऑर्गेनायजर’ आणि ‘विवेक’ यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसवरून भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याबाबतचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. या लेखांमध्ये व्यक्त करण्यात आलेले निरीक्षण तथ्यहीन होते, असेही म्हणता येणार नाही.

अजित पवारांचा कल विचारधारेकडे

चार दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘लाडकी बहीण’ सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली, ‘ही आपल्याकडून चूक झाली’ अशी प्रांजळ कबुली दिली. यात त्यांच्यातील एक ‘संवेदनशील राजकारणी’ दिसून आला. त्याचप्रमाणे नुकतीच ‘एएनआय’ला एक मुलाखत दिली त्यातही, शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल खंत व्यक्त केली आणि यापुढे त्यांच्यावर टीका करणार नाही, असे आश्वस्त केले. ‘लोकांना देखील त्यांच्यावर टीका केल्याचं आवडलं नाही. लोक त्यांच्याकडे एक ज्येष्ठ, प्रमुख नेते म्हणून पाहतात. आम्ही त्यांचा कालही आदर करत होतो, आजही करतो आणि पुढेही करत राहणार. त्यामुळे आता त्यांच्यावर काही टीका करणार नाही असंही अजित पवार यांनी कबूल केले. यात अजित पवार यांचा कल ‘युती धर्मा’पेक्षा पक्षाच्या मूळ विचारधारेकडे अधिक झुकल्याचे दिसून आले.

(हेही वाचा – ST च्या ताफ्यात येणार २४७५ नव्या बस)

ठाकरेंनी धाडस दाखवले तर…

उद्धव ठाकरे यांचा कल हा मूळ विधारधारेपेक्षा सत्तेकडे अधिक झुकल्याचे स्पष्ट होते. अजित पवार (Ajit Pawar) यांनी ज्या प्रांजळपणे चूक कबूल केली ते औदार्य दाखवण्याचे धाडस ठाकरे यांनी दाखवले तर… असा विचार निश्चितच समस्त मराठी आणि हिंदूंच्या मनात येऊ शकतो. ठाकरे यांनी अनेकदा ‘हिंदुत्व सोडलेले नाही’ यांचा पुनरुच्चार केला, त्याचवेळी ‘आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही’ असा टोलाही भाजपाला लगावला. मात्र, ‘माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी भाषणाची सुरुवात करणे का सोडले, हे सांगायला सोयीस्कर विसरतात.

प्रमुख पक्षांची भूमिका ठाम

उद्धव ठाकरे आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यातील ‘विचारधारा आणि सत्ता’ या स्पर्धेत कोण बाजी मारते? याचे उत्तर नजीकच्या काळात मिळेलच. उदाहरणार्थ, वक्फ बोर्डाच्या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक ८ ऑगस्टला लोकसभेत सादर झाले आणि विरोधकांच्या आक्षेपानंतर संसदीय संयुक्त समितीकडे फेरविचारार्थ पाठवण्यात आले. या विधेयकाला महायुतीचे म्हणजेच भाजपा-शिवसेनेचे (शिंदे) पूर्णपणे समर्थन असले तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा ठाम भूमिका घेण्याबाबत काही प्रमाणात गोंधळ उडल्याचे दिसून येते. तीच स्थिति महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची झाली आहे.

उद्धव ठाकरे-अजित पवारांचा वैचारिक गोंधळ

महाविकास आघाडीतील कॉंग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला ठाम विरोध असला तरी ठाकरे यांच्या उबाठात द्विधा मनःस्थिती आहे. त्यांचे खासदार संसदेतून तेव्हा पळून गेल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘मविआ’च्या मुंबईतील सभेत वक्फ बोर्डाचा विषय मंदिरांशी जोडून वेगळेच ‘नॅरेटीव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा ठाम भूमिका घेणे टाळले. असे प्रसंग भविष्यातही वारंवार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विधेयकावर दोन्ही पक्ष प्रमुखांना (उद्धव ठाकरे-अजित पवार) ठाम, स्पष्ट आणि उघड भूमिका घेता येत नसेल तर आपण चुकीच्या जागी आहोत, याची त्यांनी खात्री बाळगावी अन्यथा ‘सत्तेसाठी काहीही’ या मंत्राचा जप करत केवळ ‘मम्’ म्हणत सत्तेची फळे चाखत राहावी.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.