राहुल गांधींची सजा, कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मजा आणि भाजपची मज्जाच मज्जा!

267

मोदी आडनावाची बदनामी केल्यामुळे राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. कर्नाटकात प्रचारादरम्यान ’मोदी आडनावाचे सर्वजण चोर कसे असतात?’ असा प्रश्न राहुल गांधींनी केला होता. याची योग्य शिक्षा राहुल गांधींना मिळाली. दरवेळी काहीतरी बरळून माहोल निर्माण करण्याचा प्रयत्न राहुल करत असतात, त्या वाह्यात बरळण्यासाठी ही शिक्षा होती. महाराष्ट्रातील संजय राऊत हे त्यातले. ज्याप्रमाणे नळावरील भांडणे होतात, त्याप्रमाणे संजय राऊत बोलत असतात. त्यांनाही चपराक बसण्याची आवश्यकता आहे.

आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी २०१३ च्या लिली थॉमस प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा आधार घेत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याची संधी राहुल गांधी यांनी दिली. असे म्हणतात की, भारतीय समाज हा उत्सवप्रिय आहे, त्याचप्रमाणे सेक्युलर जमात ही आंदोलनप्रिय आहे. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करायला खूप आवडतात. मग भारत जोडो यात्रा असो किंवा लहान सहान कारणावरुन लोकशाही धोक्यात येणे असो, कॉंग्रेस कार्यकर्ते उत्साहात आंदोलने करतात.

म्हणूनच राहुल गांधी यांना मिळालेली सजा ही खरंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी मजा ठरलेली आहे. यामुळे त्यांना पुन्हा एकदा चमकोगिरी करण्याची संधी प्राप्त झाली. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षासाठी तर ही मज्जाच मज्जा झाली आहे. आता वाचक म्हणतील की, राहुल गांधींना शिक्षा झाली म्हणून भाजप खुश झाला आहे. तर असं मुळीच नाही. राहुल गांधी पुन्हा एकदा हीरो झाल्यामुळे भाजप आनंदात आहे. २०२४ च्या निवडणुकीसाठी भाजपला एक विरोधी चेहरा हवाच होता. राहुल गांधी हे भारतीय जनता पक्षासाठी बहुमत मिळवण्याचे उत्तम साधन आहे.

आपण खेळाखेळात एखाद्याला चण्याच्या झाडावर चढवतो आणि तो बढाया मारु लागतो. बढाया मारणार्‍याला वाटतं की मीच मोठा, मी कसा सर्वांना पुरून उरलो. पण त्याने मारलेल्या फिशारक्या हीच समोरच्यासाठी खूप मोठी गंमत असते व मनोरंजनाचे साधनही असते. राहुल गांधी यांचे तसेच आहे. भाजपने राहुल गांधींची सदस्यता नाकारुन २०२४ साठी त्यांना सर्व विरोधी पक्षांचा सर्वात मोठा नेता केला आहे. केजरीवाल किंवा शरद पवार हे तिसरी आघाडी निर्माण करण्याच्या बेतात होते, पण त्यांचा डावपेच भाजपने ओळखला आणि राहुल गांधींची सदस्यता रद्द करुन सर्व आघाड्यांना अगदी व्यवस्थित बाजूला सारले. आता भाजपविरोधातली २०२४ची निवडणूक राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढली जाईल. कारण मोदी विरोधकांच्या मते राहुल यांची सदस्यता रद्द करणे म्हणजे लोकशाहीला धोक्यात आणणे होय! लोकशाही धोक्यात आल्याची आरोळी उठवणे म्हणजे भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळवून देणे होय!

(हेही वाचा – राहुल गांधींची खासदारकी घालवणारे गुजरातचे भाजप आमदार कोण?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.