Mumbai Police : मुंबई पोलीस पथकावर गावकऱ्याचा कोयते, लाठ्याकाठ्याने हल्ला; दोन पोलीस जखमी

गावकऱ्यांनी सिसोदे आणि घुसिंगे यांना पोलिसांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली, गावकऱ्यांनी घेराव घालून पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली.

118
वैजापूर तालुक्यातील एका खेड्यात आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकाला गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस भरती घोटाळ्यातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलीसांच्या पथकावर २५ ते ३० गावकऱ्यांनी हातात कुराड, कोयते, लाठ्याकाठ्या घेऊन हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले आहे. स्थानिक पोलिसांची मदत वेळीच घटनास्थळी पोहचल्यामुळे पोलिसांचे प्राण वाचले. याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी २५ ते ३० गावकऱ्यांवर हत्येचा प्रयत्न, दंगल माजवणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे इत्यादी कलमांतर्गत गुन्हा दाखल करून ८ ते १० गावकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील दहिसर पोलिसांनी पोलीस भरती दरम्यान परीक्षा केंद्रावर गैरप्रकार पकडला होता. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली होती. या गैरप्रकारातील काही संशयित आरोपी  छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे संजरपूरवाडी येथे नातेवाईकांच्या घरी लपून बसले असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. जनकसिंग सिसोदे आणि संतोष घुसिंगे या दोघांना अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक वैजापूर येथे दाखल झाले व स्थानिक पोलिसांची मदत घेऊन संजरपूरवाडी येथे पहाटेच्या सुमारास दाखल झाले. घराबाहेर झोपलेल्या सिसोदेच्या नातेवाईकांना पोलिसांनी उठवले व आम्ही सिसोदे आणि घुसिंगे यांच्याकडे चौकशीकामी आलो असल्याचे सांगितले असता सिसोदे याचा मावस भाऊ अर्जुनसिंग बांमनावत याने आरडाओरड केली. अर्जुनसिंग याचा आरडाओरड ऐकून ३० ते ३५ गावकरी हातात कुऱ्हाडी, कोयते, लाठ्याकाठ्या घेऊन अर्जुनसिंगच्या घराजवळ गोळा झाले. पोलिस पथकाने गावकऱ्यांना समजावून सांगत, जनकसिंग सिसोदे आणि संतोष घुसिंगे या दोघांना ताब्यात घेताच सिसोदेचा मावस भाऊ अर्जुनसिंग याने गावकऱ्यांना चिथावणी दिली असता गावकऱ्यांनी सिसोदे आणि घुसिंगे यांना पोलिसांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली, गावकऱ्यांनी घेराव घालून पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी स्वतःच बचाव करीत असताना दोन पोलिस अंमलदार जखमी झाले. दरम्यान स्थानिक पोलिसांची अधिक कुमक मागविण्यात आली व पोलीस मदत गावात पोहचताच गावकरी पोबारा करू लागले असता पोलिसांनी ८ ते १० जणांना ताब्यात घेतले, या गोंधळाचा फायदा घेऊन सिसोदे आणि घुसिंगे यांनी पळ काढला. मुंबई पोलीस पथकावर हल्ला करणाऱ्या ८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यापैकी अर्जुन त्र्यंबकसिंग ब्राम्हणवट, विठ्ठल गब्रू ब्राम्हणवट, पवन त्र्यंबकसिंग ब्राम्हणवट आणि प्रताप मानसिंग बिघोत अटक करण्यात आलेल्या काही गावकऱ्याची नावे आहेत. हे सर्वजण वैजापूर तालुक्यातील संजवारपूरवाडी येथील रहिवासी आहेत. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.