Police : आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने केले असे कृत्य जे ऐकून पोलिसही झाले थक्क..

265
  • संतोष वाघ

आईला घरात कुत्रा पाळण्याची हौस बघून तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने चक्क एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून आईची इच्छा पूर्ण केल्याची घटना घाटकोपर येथे उघडकीस आली. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने केलेल्या कृत्याचे कौतुक करावे की त्याला अटक करून तुरुंगात टाकावे, असा प्रश्न कदाचित पोलिसांना (Police) पडला असावा, परंतु त्याने केलेले कृत्य चुकीचे होते म्हणून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

विनायक शेळके (२१) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. घाटकोपर पश्चिम येथील एका चाळीत आई वडील आणि लहान भावासह राहण्यास आहे. विनायकचे वडील खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करतात तर विनायक याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला असून एका हॉटेलमध्ये बार टेंडर म्हणून नोकरीला होता. विनायकच्या आईच्या मैत्रीनीच्या घरी ‘सिह्टझु’ जातीचा श्वानाचे पिल्लू आहे, आपल्या घरात देखील असेच एक कुत्र्याचे पिल्लू असावे अशी विनायकच्या आईची देखील खूप इच्छा होती.

आईने ती इच्छा विनायकला बोलून दाखवली, आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने सिह्टझु जातीच्या श्वानांच्या पिल्लाची किंमत विचारली, परंतु किंमत आवाक्याबाहेर असल्यामुळे एवढी रक्कम कुठून आणावी म्हणून विचारात असलेल्या विनायकने गेल्या आठवड्यात घाटकोपर पश्चिम भटवाडी येथील गणेश मंदिराजवळ एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढला, ही सोनसाखळी विकून त्याने आईसाठी सिह्टझु जातीच्या श्वानाचे पिल्लू २० हजार रुपयात विकत घेऊन ते पिल्लू आईला भेट देऊन आईची इच्छा पूर्ण केली. (Police)

(हेही वाचा Signal School : मुंबईत उभी राहते पहिली सिग्नल शाळा, वस्तू विकणाऱ्या आणि भिक मागणाऱ्या मुलांना आणणार शिक्षणाच्या प्रवाहात)

घाटकोपर पोलिस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस (Police)  निरीक्षक दिपाली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कैलास तिरमारे उपनिरीक्षक पद्माकर पाटील तसेच कोयंडे, देवार्डे, कंक व पथकाने तत्काळ तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळावरील सीसिटिव्ही फुटेज तपासले. तब्बल ५५ ठिकाणचे फुटेज तपासल्यानंतर त्यातून मिळालेल्या पुसटशा फुटेजवरून खबऱ्यांना कामाला लावले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विनायक शेळके याला राहत्या घरातून अटक केली.

पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत विनायकने सोनसाखळी चोरी करण्याचे कारण पोलिसांना सांगितले, मात्र विनायक खोटं बोलत असावा म्हणून पोलिसांनी खात्री केली असता विनायकने खरोखर आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी चोरी केल्याचे समोर आले.आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने केलेल्या कृत्यामुळे पोलिसांना काही वेळासाठी काही सुचत नव्हते, परंतु गुन्हा घडला होता, त्यामुळे पोलिसांनी विनायकला चोरीच्या गुन्ह्यात अटक करून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.