Kidnap : फिल्मी स्टाईलने हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण; १२ तासांत ७ जणांना अटक

सात ही आरोपींना अपहरण, खंडणी, धमकी देणे, दंगल, भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्ह्यात अटक करून त्यांच्याजवळून दोन पिस्तुल आणि दोन चॉपर जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

143

हवेत गोळीबार करत फिल्मी स्टाईलने हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण Kidnap करण्यात आल्याची घटना मुंबईतील अंधेरी पूर्वेत सोमवारी, २४ एप्रिल रोजी दुपारी घडली. एमआयडीसी पोलिसांनीदेखील त्याच स्टाईलने अपहरणकर्त्यांचा पाठलाग करून १२ तासांत ७ जणांच्या मुसक्या आवळून हॉटेल व्यावसायिकाची सुखरूप सुटका केली आहे.

अनुप शेट्टी असे अपहरण Kidnap करण्यात आलेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे.अंधेरी कुर्ला रोड चकाला या ठिकाणी शेट्टी यांचे हॉटेल विरा रेसिडेन्सी नावाचे हॉटेल आहे. सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विजय अवकिरकर आणि त्यांच्या चार सहकारी यांनी हॉटेलमध्ये असलेल्या शेट्टी यांच्या कॅबिनमध्ये घुसून त्यांना शस्त्राचा धाक दाखवत, कॅबिनमधून बाहेर आणले आणि पिस्तुलमधून हवेत तीन गोळ्या झाडत शेट्टी यांचे त्यांच्याच मोटारीतून अपहरण करण्यात आले होते.

अपहरणाची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्ही, तसेच तांत्रिकरित्या तपास करून अपहरणकर्त्याचा पाठलाग सुरू केला, दरम्यान अपहरणकर्त्यांनी शेट्टी यांच्या निकटवर्तीय मार्फत शेट्टी यांच्या सुटकेसाठी ५० लाख रुपयांची मागणी केली होती. शेट्टी यांच्या निकटवर्तीय यांना आलेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती काढून तांत्रिक तपासावरून पोलिसांच्या एका पथकाने ठाणे रेतीबंदर येथून स्वप्नील अवकिरकर आणि वैभव जानकर या दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघांच्या चौकशीत अपहरणकर्ते हे ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या दिशेने गेल्याची माहिती मिळताच अपहरणकर्त्यांच्या मागावर असणाऱ्या पोलीस पथकाला ही माहिती देण्यात आली.

(हेही वाचा कुर्ला रेल्वे पोलिसांनी १२ तासांत उघडकीस आणला अपहरणाचा गुन्हा, महिलेला अटक)

पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकाने शहापूर तालुक्यातील किन्हवली या ठिकाणी धाव घेतली, दरम्यान अपहरणकर्ते Kidnap हे ठाण्याच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी अपहरणकर्त्याच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांनी अपहरकर्त्याची वाट अडवून मध्यरात्री अडीजच्या सुमारास शहापूर तालुक्यातील किन्हवली माणगाव येथे अपहरणकर्त्याचे वाहन ताब्यात घेऊन विजय अवकिरकर, चंद्रकांत अवकिरकर, सागर गांगुर्डे, मनोज लोखंडे आणि गुरुनाथ वाघे यांच्या मुसक्या आवळत हॉटेल व्यवसायिक अनुप शेट्टी यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

ताब्यात घेण्यात आलेल्या सातही आरोपींना घेऊन तपास पथक एमआयडीसी पोलीस ठाण्याला दाखल झाले. सात ही आरोपींना अपहरण, खंडणी, धमकी देणे, दंगल, भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्ह्यात अटक करून त्यांच्याजवळून दोन पिस्तुल आणि दोन चॉपर जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक आरोपी विजय अवकिरकर हा हॉटेल व्यवसायिक अनुप शेट्टी यांच्या परिचयाचा असून वर्षभरापूर्वी विजय अवकिरकर याने शेट्टी यांच्याकडून हॉटेल विरा रेसिडेन्सी चालविण्यासाठी घेतले होते, सहा महिन्यांनी त्याने पुन्हा ते हॉटेल शेट्टीच्या ताब्यात दिले होते, डिसेंबरपासून अनुप शेट्टी हे स्वतः हे हॉटेल चालवत आहे. या दरम्यान या दोघांमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे,पोलीस निरीक्षक महेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यश पालवे तसेच खार पोलीस ठाणे, विलेपार्ले पोलीस ठाण्याचे पथकाने केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.