fake gold loan scam : नकलीला ठरवले असली; आपल्याच व्यक्तीकडून बॅंक फसली

सोने गहाण ठेवून कर्ज घेणारा आणि ते सोने शुद्ध असल्याचे प्रमाणपत्र देणारा यांनी मिळून बॅंकांची फसवणूक केली आहे.

97

खोटी कागदपत्रे सादर करून किंवा बनावट कंपन्यांच्या नावाने कोट्यवधींचे कर्ज घेणारे महाभाग आपण पाहिले आहेत. पण आता फसवणुकीचा एक नवा प्रकार समोर आला आहे. बॅंकेने नेमलेल्या व्हॅल्यूअरनेच बॅंकेला चुना लावल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील आरोपी सपना कुमार भट हीचे कारनामे बंटी-बबली चित्रपटातील बबलीलाही लाजवणारे असे आहेत. सोने गहाण ठेवून कर्ज घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांशीच fake gold loan संगनमत करून सपनाने बॅंकांचीच फसवणूक केली आहे.

सोने गहाण ठेवून त्यावर कर्ज दिले जाते. यावेळी बँक त्या दागिन्यांची शुद्धता तपासून त्याची किंमत ठरवते आणि त्यानुसार बँक कर्ज देते. याच प्रक्रियेत आरोपी सपना हीने नवी आयडिया शोधून काढली. ही आयडिया ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.

अशी आहे मोडस ऑपरेंडी

मालाडमधील बँक ऑफ इंडिया आणि गोरेगावमधील मॉर्डन सहकारी बँक या दोन बॅंकांमधील फसवणुकीच्या घटनांची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यामधून मिळालेल्या माहितीनुसार सोने गहाण ठेवून कर्ज घेणारा आणि ते सोने शुद्ध असल्याचे प्रमाणपत्र देणारा यांनी मिळून बॅंकांची फसवणूक केली आहे.

कर्ज हवे असणारी व्यक्ती बनावट सोन्याचे दागिने घेऊन बँकेत येते, बँक त्या दागिन्यांचे वजन करून त्याची शुद्धता तपासण्यासाठी ते दागिने बँकेने नेमलेल्या ‘व्हॅल्यूअर’ (सोनं तपासून त्याचे मूल्यमापन करणारे) कडे पाठवते. पण बॅंकेने नेमलेला व्हॅल्यूअर आणि कर्ज मागण्यासाठी आलेल्या व्यक्तीने आधीच संगनमताने फसवणुकीची ही योजना आखलेली असल्याने व्हॅल्युअर ते सगळे दागिने शुद्ध असल्याचे प्रमाणपत्र देतो. या आधारे बॅंक लाखो रुपयांच्या कर्जाची रक्कम कर्जदाराच्या खात्यात जमा करते. त्यानंतर कर्जदार त्यातील व्हॅल्युअरचा हिस्सा त्याला देतो. अशी ही फसवणुकीची मोडस ऑपरेंटी आहे.

(हेही वाचा Police Officer Transfer : राज्य पोलीस दलातील उच्च पदस्थांच्या बदल्यांना मिळाला मुहूर्त )

६ जणांकडून ८० लाखांची फसवणूक

सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज देण्याच्या प्रकरणातून तब्बल ३ कोटींची फसवणूक उघडकीस आली आहे. जेव्हा मालाड येथील बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक राहुल कोंडर यांनी २१ डिसेंबर २०२२ रोजी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार केली, तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला.

कर्जदार जेव्हा कर्जाचे हप्ते भरत नसल्याचे समोर आले, तेव्हा काही कालावधीनंतर नियमानुसार कर्ज वसुलीसाठी सहा जणांनी गहाण ठेवलेले दागिने लिलावासाठी काढण्यात आले. तेव्हा बँकेने या सोन्याच्या दागिन्यांचे मूल्यमापन करण्यासाठी बँकेच्या पॅनलवर असलेले गणेश ज्वेलर्स यांच्याकडे दिले. गणेश ज्वेलर्स यांनी दागिने तपासले असता हे सर्व दागिने नकली fake gold असल्याचे बँकेला कळवले. तेव्हा बँकेच्या व्यवस्थापकाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यात बँकेची व्हॅल्युलर सपना कुमार भट हिच्यासह ७ जणांविरोधात पोलिसांनी विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात जितेंद्र भोसले आणि वैशाली भोसले या दाम्पत्याचा समावेश आहे. भोसले दाम्पत्यासह ६ जणांनी सोने गहाण ठेवून सुमारे ८० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ६ जणांनी बँकेकडे गहाण ठेवण्यासाठी आणलेल्या सोन्याच्या दागिन्यांची तपासणी आणि त्यांचे मूल्यमापन बँकेने नेमलेल्या व्हॅल्यूअर सपना कुमार भट यांनी केले होते. त्यानुसार बँकेने ६ जणांना कर्ज दिले होते.

टोळीच सक्रीय असल्याची शक्यता

दुसरा गुन्हा गोरेगाव पश्चिम येथील मॉडेल को. ऑप. बँकेचे व्यवस्थापक सावीया डिक्रूझ यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात २७ डिसेंबर २०२२ रोजी दाखल केला आहे. या गुन्ह्यात एकूण १५ आरोपी असून त्यातही व्हॅल्यूअर सपना कुमार भट आणि जितेंद्र भोसले यांचा समावेश आहे. मॉडेल बँकेने १४ जणांना सोने गहाण ठेवून १ कोटी ७४ लाख ४७ हजार रुपयांचे कर्ज दिले होते. या बँकेतदेखील व्हॅल्यूअर म्हणून सपना कुमार भट यांची बँकेने नेमणूक केली होती. तिनेच या सोन्याच्या दागिन्यांचे मूल्यमापन करून सोने अस्सल असल्याचे बँकेला प्रमाणपत्र दिले होते. गोरेगाव येथील घटनेत एकाच कुटुंबातील ४ जणांचा समावेश आहे. डिसेंबर २०२२ मध्ये दाखल झालेल्या या दोन्ही गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यात १५ आरोपी असून दुसऱ्या गुन्ह्यात ७ आरोपी आहेत. त्यापैकी तीन आरोपींची नावे दोन्ही गुन्ह्यांत आहेत. मालाड येथील बँक ऑफ इंडिया तर गोरेगाव येथील मॉडर्न सहकारी बँक या दोन बँकांची जवळपास तीन कोटींची फसवणूक झाली आहे. या सगळ्या प्रकरांमध्ये ही एक टोळीच असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून ती बॅंकांना फसवत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.